"नाडगौड" इतिहासातील एक दुर्लक्षित पान ..


जुन्या काळी मोकासा,  सरदेशमुखी ,  पाटीलकी ,  कुळकर्णी,  देशपांडे ह्या वतन विषयक संज्ञा अस्तित्वात होत्या. त्याच धर्तीवर " नाडगौड" हे देखिल एक पद अस्तित्वात होते. परंतु अनेक इतिहासकारांच ह्या वंशपरंपरागत हक्काकड़े दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. नावावरूनच लक्षात येते की हा शब्द कानडी असावा. ह्या नावाचा उल्लेख खास करून मौखिक साधनात येतो. तो असा शिखर शिंगणापूर च्या पायथ्याशी असणाऱ्या नातेपुते गावचा पाटील म्हनजे पांढरे घराण्यातील आबगौड व त्याचा भाऊ दुष्काळामुळे गायी चारण्यासाठी कर्नाटक भागातील विजापूर कड़े गेल्याचे मौखिक साधनात सांगितलं आहे. (संदर्भ सागर माने यांची कवलापुर येथील महासिध्द मंदिरात गायलेली ओवी )

त्यानंतर नाडगौड  संदर्भात विस्तृतपणे आलें आहे ते संतोष पिंगळे यांच्या सरंजामी मरहट्टे या संदर्भ ग्रंथात. त्यातील उल्लेख पुढील प्रमाने  त्याचे स्वरूप चौथाई  च्या शेकडा दोन टक्के रक्कम ही नाडगौडी स्वरुपात दिली जाते. ही रक्कम छ शाहु नी आपल्या मर्जीतील काहि सरदारांनाच दिली होती. नाडगौडा , नाडगावडा ह्यातील नाडू म्हनजेच प्रांत अथवा जिल्हा आणि गावडा म्हनजे गौड त्यावरील अधिकारी होय. हा कानडी शब्द असून आजही कर्नाटकात गौड हा शब्द अदबीने उच्चारतात. नाडगौडा हा अधिकारी महाराष्ट्रातील देशमुख ,  देशपांडे दर्जाचा असतो. नाडगौडाचा अधिकार खुद्द छत्रपती देत असत . छत्रपती राजाराम महाराजांनी  यांनी पांढरे बंडगर पंतप्रतिनिधी घोरपडे महारनवर आटोळे इ सरदारांना हें पद वंश परंपरेने दिले होते.त्यावेळी या वतनी हक्कपोटी या सरदारांनी ऐकून जमावबंदीचा शेकडा दोन्ही रक्कम परभारे  वसूल करावी असे ठरले होते .याचा अर्थ हा हक्क छत्रपतींच्या सरदेशमुखी हक्काप्रमाणे प्रत्यक्ष रयतेकडून जमाबंदीचा ऐकून आकार विचारात घेऊन वसूल केला जाणारा होता. 

ह्या वरून शिवकाळात हा हक्क सर्रास वापरल्याचे दिसून येते. 


ह्याच पध्दतीचे देशगावडकी नावाचे वतन पुणे जिल्ह्यातील हिंगणगावच्या थोरात मंडळी कड़े होते. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी येथे दिलेल्या सनदेवरून ह्या बाबतीत अशी माहिती मिळते की संपूर्ण पुणे प्रांतावर देशगावडकीचे अधिकार थोरात घराण्याकडे होते. इंदौरच्या होळकर घराण्याचे मल्हारराव होळकर यांच्या आजोबांच्या कड़े देखिल गावडकी चे पद असल्याचे संदर्भ मिळाले आहेत. 


ह्या वरून हें दिसून येते की नाडगौड हें पद  पाटील देशमुख कुळकर्णी ह्यांच्या बरोबरीचे मानाचे पद आहे. आज देखिल सांगली कोल्हापूर भागात अनेक गावडे पाटील घराणी मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत . मात्र ह्या नाडगौड पदवी विषयक आणखी संशोधन होणे गरजेचे आहे . जर आपल्याकड़े  नाडगौड ह्या पदवी विषयी आणखी माहिती असल्यास नक्की कळवा. 


धन्यवाद 

मधुकर हक्के 

मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ 

संदर्भ : सरंजामी मरहट्टे संतोष पिंगळे 

मर्हाटि संस्कृतीच्या काहि समस्या श बा जोशी 

काहि मौखिक साधने.

टिप्पण्या